श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई: सुपरमार्केटमधील चोरीचा 24 तासांत पर्दाफाश

श्रीरामपूर वेब टिम : येथील संगमनेर रोडवरील के. पी. सुपर मार्केटमध्ये झालेल्या चोरीचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 1,20,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 09:30 ते 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 07:00 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने के. पी. सुपर मार्केटचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला होता. चोरट्याने गल्ल्यातून 80,000/- रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेनंतर दुकानाचे मालक सुमित गुलाटी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 331 (4) आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण केले. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी या चोरीमध्ये अभय उर्फ किशोर केदारे (वय 19, रा. अहिल्यानगर) आणि समीर जाकीर सय्यद (वय 20, रा. अहिल्यानगर) यांचा सहभाग असल्याची माहिती मिळवली.

पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांचे साथीदार अकबर (फरार) आणि अन्सार शेख (फरार) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला:

45,630/- रुपये रोख रक्कम

75,000/- रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची काळ्या रंगाची रायडर मोटारसायकल (गुन्हा करण्यासाठी वापरलेली)

या कारवाईमध्ये एकूण 1,20,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ जयवंत तोडमल, पोना भागवत शिंदे, आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोना भागवत शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *