राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)२५ ऑगस्ट : – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व जुनिअर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक माणिक गहिनीनाथ मेहेत्रे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ नुकताच विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, मंडळाचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्ष तनपुरे यांनी माणिक मेहेत्रे यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “आपल्या कर्तव्यात कसूर न करता योग्य प्रकारे योगदान देणारे कर्मचारी समाजाला नेहमीच प्रिय असतात आणि याचे उत्तम उदाहरण माणिक मेहेत्रे यांच्या कार्यशैलीमुळे दिसून येते.” ते पुढे म्हणाले की, “नोकरीच्या काळात आपण कशी सेवा देतो, त्यावर आपले योगदान अवलंबून असते आणि ज्याचे योगदान उत्कृष्ट असते, त्यांना समाज देखील डोक्यावर घेतो. मेहेत्रे यांनी आपल्या कृतीतून हेच सिद्ध केले आहे. असे कर्मचारी इतरांसाठीही मार्गदर्शक ठरतात आणि संस्थेची प्रतिष्ठा वाढवतात. मेहेत्रे यांच्या रूपाने मंडळाला एक आदर्श कर्मचारी मिळाला आहे.”
तनपुरे यांनी विशेषतः नमूद केले की, हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, ज्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम केले अशा एका व्यक्तीच्या आणि एका आईच्या मुलाचा आहे, याचा विशेष अभिमान वाटतो. मेहेत्रे यांच्या आईंच्या उपस्थितीत हा गौरव होत असल्यामुळे तो खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, संचालक भारत वारूळे, अरुण ढुस, कृष्णा मुसमाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार, माजी संचालक द्वारकानाथ बडदे, रमेश वारुळे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी गाडे, साहेबराव रक्टे, सरपंच सविता प्रकाश राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, संचालक भारत वारुळे आणि द्वारकानाथ बडदे यांनी देखील मेहेत्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बी. वाय. काळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. पी. खर्डे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक प्रतिनिधी संजय कोळसे, शिक्षिका प्रतिनिधी ए. बी. खर्डे, शिक्षकेतर प्रतिनिधी एस. ए. गाडेकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.