राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२५ ऑगस्ट :- अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी श्रीरामपूर विभागात आता कठोर पावले उचलली जात आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) आता केवळ अत्याचार करणाराच नव्हे, तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे हॉटेल, लॉज किंवा कॅफे चालक-मालक देखील सह-आरोपी असतील.
कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद
पोक्सो कायद्यानुसार, १८ वर्षांखालील कोणत्याही मुलावर लैंगिक अत्याचार झाल्यास, अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा होते. मात्र, याच कायद्यातील काही कलमांनुसार, अशा अत्याचारांसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीलाही मुख्य आरोपीइतकीच शिक्षा मिळू शकते. याचाच अर्थ, जर एखाद्या हॉटेल, लॉज किंवा कॅफेच्या चालकाने किंवा मालकाने अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारासाठी आपली जागा दिली असेल, तर त्यालाही १० वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर, राहुरी पोलीस स्टेशनमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या एका बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात, आरोपीने दोन वेगवेगळ्या लॉजचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, त्या दोन्ही लॉजच्या चालकांना या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे.
श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनमध्ये सध्या दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये, जर कोणत्याही हॉटेल किंवा लॉजच्या मालकाने निष्काळजीपणे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आपली जागा उपलब्ध करून दिली असेल, तर त्यांनाही सह-आरोपी केले जाईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.
वाघचौरे यांनी सर्व हॉटेल-लॉज चालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या हॉटेल्स आणि लॉजमध्ये येणाऱ्या व्यक्तींची नोंद रीतसर रजिस्टरमध्ये ठेवा. त्यांच्या वयाची पडताळणी करा आणि त्याचा पुरावा आपल्याकडे जपून ठेवा. केवळ थोड्या आर्थिक फायद्यासाठी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर, लोणी, कोपरगाव आणि सोनईसारख्या शहरांमध्ये अनेक मोठी शैक्षणिक संकुले आहेत. येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने अल्पवयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर आणि मालकांवर कठोर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल, असेही वाघचौरे यांनी सांगितले आहे.