राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) ,२४ ऑगस्ट: ठाणे महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले एक कर्मचारी, जे स्मृतिभ्रंशामुळे घरचा पत्ता विसरले होते, त्यांना राहुरी येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत करण्यात आले.
शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते पिंटू म्हासरे यांना राहुरी शहरात एक वृद्ध व्यक्ती एकटेच फिरताना आढळले. ते नीट बोलू शकत नव्हते. म्हासरे यांनी तातडीने राहुरी पोलीस दलातील सहायक फौजदार तुळसीदास गीते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. गीते यांनी तात्काळ मदत करत राहुरी रेल्वे स्टेशन येथील “कृपा वृद्धाश्रम” च्या संचालिका श्रीमती रोहिणी एरिक सॅकमन यांच्याशी संपर्क साधला आणि त्या वृद्ध व्यक्तीची राहण्याची व्यवस्था वृद्धाश्रमात केली.
त्या व्यक्तीकडे तपासणी केली असता, त्यांच्याजवळ ठाणे महानगरपालिकेचे जुने ओळखपत्र, आधार कार्ड, काही रोख रक्कम आणि शिर्डीचे बस तिकीट सापडले. आधार कार्डवरून त्या व्यक्तीचे नाव महादेव विश्राम मोरे (वय ८०), राहणार ठाणे अशी माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पत्रकार दिनेश गायकवाड यांनी ठाणे येथे संपर्क साधून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यावेळी ते व्यक्ती स्मृतिभ्रंशामुळे घरचा पत्ता विसरले होते, असे समजले.
ही माहिती मिळताच महादेव मोरे यांची पत्नी आणि बहीण त्यांना घेण्यासाठी राहुरीला रवाना झाल्या. शनिवार, २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता त्या दोघी “कृपा वृद्धाश्रम” मध्ये पोहोचल्या. सहायक फौजदार तुळसीदास गीते आणि पिंटू म्हासरे यांच्या उपस्थितीत श्री. महादेव मोरे यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.”कृपा वृद्धाश्रम” च्या सर्व कर्मचारी यांनी त्यांची खूप चांगल्या प्रकारे निगा राखली होती .
या संवेदनशील सामाजिक कार्यात पिंटू म्हासरे, त्यांचे सहकारी, पत्रकार दिनेश गायकवाड, आणि “कृपा वृद्धाश्रम” च्या संचालिका श्रीमती रोहिणी एरिक सॅकमन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेनंतर सहायक फौजदार तुळसीदास गीते यांनी प्रत्येकाने अशा प्रकारे सामाजिक कार्य करावे, असे आवाहन केले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे हरवलेली व्यक्ती आपल्या घरी सुखरूप परतली.