शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान – कुलगुरु डॉ. शरद गडाख

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे), दि. 22 ऑगस्ट:- 

कोरडवाहू फळपिकांच्या उत्पादनांमध्ये भारत जगामध्ये दुसर्या स्थानी आहे. महाराष्ट्राचे 18 लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू फळपिकांखाली येते. कोरडवाहू फळपिके कमी पाणी तसेच अती तापमानात तग धरतात. या पिकांमध्ये असणार्या औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत मोठी मागणी असते. कोरडवाहू क्षेत्र असणार्या तसेच कमी पाण्याची उपलब्धता असणार्या शेतकर्यांना उत्पन्न वाढीसाठी कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे उद्यानविद्या विभागांतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन योजनेची 29 वी वार्षिक कार्यशाळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या विज्ञान) डॉ. संजय कुमार सिंग हे उपस्थित होते. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे फळे आणि लागवड पिके योजनेचे सहाय्यक महासंचालक डॉ. व्ही.बी. पटेल उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर भा.कृ.अ.प.-सी.आय.ए.एच, बिकानेरचे प्रकल्प समन्वयक डॉ. जगदीश राणे, राहुरी कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. टी.ए. मोरे, कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील व कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस.पी. गायकवाड उपस्थित होते. 

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. संजय कुमार सिंग म्हणाले की संपूर्ण भारतासाठी कोरडवाहू फळांच्या संशोधनाचा आराखडा ठरविणे हा या बैठकीचा हेतू आहे. कोरडवाहू फळपिकांमध्ये कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीत तग धरुन राहण्याची क्षमता असते. आजच्या बदलत्या हवामानामध्ये ही फार मोठी फायदेशीर बाब असल्यामुळे या कोरडवाहू फळपिकांना चॅम्पियन पिके म्हंटले तर वावगे होणार नाही. हलक्या प्रतिची तसेच कमी पाण्याची उपलब्धता असणार्या कोरडवाहू जमीनीत कोरडवाहू फळपिके चांगले उत्पन्न देतात, ही शेतकर्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. कोरडवाहू फळपिकांकडे औषधी गुणधर्म तसेच हर्बल दृष्टीकोनातून अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी कोरडवाहू फळपिके महत्वाची भूमिका बजावू शकतात. या पिकांमध्ये असणार्या औषधी गुणधर्म तसेच विविध उपयोगी मुलद्रव्यांमुळे मानवी आहारात मोठे महत्व असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. जगदीश राणे यांनी सन 2024-25 या वर्षाच्या प्रकल्प समन्वयकांच्या अहवालाचे सादरीकरण केले. 

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारतातील विविध संशोधन केंद्रांनी तयार केलेल्या पुस्तीकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी नवी दिल्ली येथील इचीबन क्रॉप सायन्स लि.चे सर व्यवस्थापक अनील चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बी.टी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी भा.कृ.अ.प.-आय.आय.एच.आर., बंगळुरूचे प्रकल्प समन्वयक डॉ. प्रकाश पाटील, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी.सी. त्रिपाठी, परभणी कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. डी.पी. वासकर, नियंत्रक सदाशीव पाटील, गणेशखिंड येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर, देशाच्या 11 राज्यातून 80 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *