राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),१८ ऑगस्ट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिकट परिस्थितीतून जात असल्या, तरी पालक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे या शाळांना निश्चितच चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी १०० झाडांच्या वृक्षारोपणाची संकल्पना कौतुकास्पद असल्याचेही सांगितले.
तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेत वृक्षारोपण, मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गणवेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण पेरणे होते.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष अभ्यासापासून दूर जात असले तरी, जिल्हा परिषद शाळांनी सुजाण नागरिक घडवले आहेत, असे त्यांनी सांगितले. शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि माजी सैनिकांचा शाळेने केलेला सन्मान ही एक उल्लेखनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पत्रकार विनीत धसाळ यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी माजी सैनिक, शिक्षक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र, उन्हाळ्यामुळे १०० झाडांच्या वृक्षारोपणाचा उपक्रम त्यावेळी पूर्ण होऊ शकला नाही, जो आता पूर्ण होत आहे.
यावेळी हभप भगवान महाराज मोरे, सोसायटी सदस्य अविनाश पेरणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक भैय्यासाहेब आढाव, माजी मुख्याध्यापक मच्छिंद्र कडाळी, मुख्याध्यापक प्रभुजी बाचकर, शिक्षिका कल्याणी खराडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.