समता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत शिंदे यांची फेरनिवड

राहुरी प्रतिनिधी (शरद पाचारणे)१८ ऑगस्ट : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत रामदास शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नुकतीच मुंबई येथे अखिल भारतीय समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली.

१२ जुलै रोजी अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, रवी भाऊ सोनवणे, समाधान जेजुरकर,प्रा.संतोष विरकर, अंबादास गारुडकर, डॉ.नागेश गवळी,अनिल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता. याच बैठकीच्या अनुषंगाने प्रशांत शिंदे यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर प्रशांत शिंदे यांनी नामदार छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे आभार मानले. त्यांना सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ‘गाव तेथे शाखा आणि वाडी तेथे कार्यकर्ते’ तयार करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. सर्व बहुजनांना सोबत घेऊन सर्वसमावेशक काम करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गरीब आणि गरजू लोकांना समता परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे म्हणाले. ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढ्यात अग्रेसर राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल आणि जे तरुण युवक ओबीसी समाजासाठी काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाईल असे आवाहन त्यांनी केले.

प्रशांत शिंदे यांच्या फेरनिवडीबद्दल ज्येष्ठ नेते पद्मकांजी कुदळे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, धनंजय गाडेकर, बाळासाहेब ताजणे, भाऊसाहेब मंडलिक यांच्यासह सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *