राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),१५ ऑगस्ट : राहुरी पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने आणि शिक्षण विभाग, पंचायत समितीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमांतर्गत, तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला.
अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून, २६ जून, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या आंतरशालेय स्पर्धांमध्ये तालुक्यातून सुमारे ९,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांतील (निबंध आणि चित्रकला) प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर, नायब तहसीलदार नामदेवराव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त १४, १५ आणि १६ ऑगस्ट, २०२५ रोजी तालुक्यांतील सर्व शाळांमध्ये रॅली आणि प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मुलांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धाही घेण्यात येत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग, राहुरी आणि गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांचे विशेष सहकार्य लाभले.