राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ) दि. 15 ऑगस्ट :-
शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीनही विभागात महात्मा फुले कृषी विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. विद्यापीठाने आतापर्यंत 314 वाण, 54 सुधारित अवजारे व 1827 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने सुधारित पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात राबविण्यात येत आहे.
अशा प्रकारे देशाच्या विकासात कृषि विद्यापीठ भरीव योगदान देत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण केल्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक डॉ. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड कृषी तंत्रज्ञान चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके,प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले, सर्व विभाग प्रमुख, एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.
डॉ. साताप्पा खरबडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज आपण 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा सन्मान करण्याबरोबरच भविष्याला प्रेरणा देणे आणि आकर्षक उपक्रमांद्वारे तरुणांमध्ये देशभक्तीचा अभिमान आणि राष्ट्रीय एकता वाढवण्याचे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.
53 व्या जॉइंट अॅग्रेस्कोमध्ये सात वाण, तीन अवजारे व 59 तंत्रज्ञान शिफारशी सादर करुन संशोधन कार्यातही महात्मा फुले कृषि विद्यापीठाने भरीव कामगिरी केली आहे. विस्तार कार्यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राद्वारे एक खिडकी तंत्रज्ञान प्रणाली सुरू आहे. विद्यापीठांतर्गत 27 विक्री केंद्र सुरू केली असून विद्यापीठाद्वारे उत्पादित सर्व निविष्ठा शेतकरी बांधवांना फुले ऍग्रो मार्ट ऑनलाइन पोर्टल द्वारे उपलब्ध होत आहेत. कृषी विज्ञान केंद्र द्वारे विकसित कृषी संकल्प अभियान उपक्रमाद्वारे विद्यापीठांतर्गत एकूण 1530 गावांना भेटी देण्यात आल्या व साडेचार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना विद्यापीठ तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यात आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.