राहुरी वेब प्रतिनिधी(शरद पाचारणे ) १४ ऑगस्ट :- तालुक्यातील माहेगाव शिवारात शेतीत विजेचा खांब उभारत असताना विजेचा धक्का लागून एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांनी ठेकेदार नानासाहेब पवार आणि शेतमालक निखील चौरे यांच्या विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाऊसाहेब बाळासाहेब कावरे (रा. बिरोबा बन, माहेगाव शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा नितीन (वय १९ ) हा सुट्टीच्या दिवशी नानासाहेब चंद्रकांत पवार (रा. माहेगाव) या ठेकेदाराकडे काम करायला जात होता. नानासाहेब पवार यांनी निखील प्रभाकर चौरे (रा. अहिल्यानगर) यांच्या दरडगाव तर्फे बेलापुर शिवारातील शेताच्या कडेला लाख रस्त्या लगत गट नंबर १०९ /१ मधील शेतात विद्युत जोडणीचे काम करण्याचे कंत्राट घेतले होते.
घटनेच्या दिवशी, ८ मे २०२५ रोजी नितीन ठेकेदार नानासाहेब पवार यांच्यासोबत कामाला गेला होता. दरडगाव शिवारात निखील चौरे यांच्या शेतात ११ केव्ही महाडूक सेंटरच्या वाहिनीजवळ ट्रॅक्टरच्या मदतीने सिमेंटचा पोल उभा करण्याचे काम सुरू होते. याचवेळी पोलच्या खालील बाजूस लोखंडी पहारीने पोल उभा करत असताना, पोलमधील तारेचा स्पर्श मुख्य विद्युत वाहिनीला झाला. यामुळे पोलमध्ये वीजप्रवाह उतरला आणि नितीनला विजेचा जोरदार धक्का बसला.
या घटनेची माहिती भाऊसाहेब कावरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने राहुरी येथील खाजगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच नितीनचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर भाऊसाहेब कावरे यांना समजले की, हे काम करण्यासाठी महावितरण कंपनीची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि विजेचा पुरवठा बंद न करताच धोकादायक परिस्थितीत काम सुरू होते. ठेकेदार नानासाहेब पवार आणि शेतमालक निखील चौरे यांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नानासाहेब चंद्रकांत पवार (ठेकेदार) आणि निखील प्रभाकर चौरे (शेतमालक) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत .