राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) ०९ ऑगस्ट: रक्षाबंधनाच्या दिवशी राहुरी पोलिसांनी कर्तव्यालाच आपली राखी मानत एक प्रशंसनीय कामगिरी केली आहे. दोन दिवसांपूर्वी घरातून गेलेल्या एका महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा शोध घेत त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
राहुरी पोलीस ठाण्यात या संदर्भात मनुष्य हरवल्याची (मिसिंग) तक्रार (रजि. नंबर १३९/२०२५) दाखल होती. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी या महिला व तिच्या मुलीचा शोध पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी परिसरातून घेतला. त्यानंतर त्यांना राहुरी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस हवालदार राहुल यादव आणि सूरज गायकवाड यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे आणि श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. अशोक शिंदे, पोकॉ. अंजली गुरवे, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर येथील मोबाईल सेलचे पोना. संतोष दरेकर आणि पोहेका. सचिन धनाड यांचा समावेश होता.