राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),१० ऑगस्ट : राहुरी तालुक्यात एका ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्यांच्या शेळ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा जाब विचारल्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित वृद्ध गंगाधर सखाराम झांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चारुदत्त पांडुरंग पवार आणि बबन प्रभाकर पानसंबळ या दोन व्यक्तींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी, 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दीड वाजता घडली. गंगाधर झांबरे हे चिंचविहिरे गावात आपल्या शेतात शेळ्या चारत होते. त्यावेळी चारुदत्त पवार आणि बबन पानसंबळ हे त्यांच्या चारचाकी गाडीतून तेथे आले. त्यांनी निष्काळजीपणे गाडी चालवत झांबरे यांच्या काही शेळ्यांना जखमी केले.
आपल्या शेळ्या जखमी झाल्याचे पाहून झांबरे यांनी त्यांना “तुम्ही आमच्या शेळ्यांच्या अंगावरून गाडी का घातली?” असे विचारले. यावर संतापलेल्या आरोपींनी “तुम्हाला शेळ्या चारण्यासाठी हाच रस्ता मिळाला आहे का?” असे म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. चारुदत्त पवार यांनी गंगाधर झांबरे यांच्या तोंडावर हाताने मारले, ज्यात त्यांचे काही दात पडले. त्याचवेळी, बबन पानसंबळ यांनी मागून पकडून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, असे झांबरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या गंभीर घटनेनंतर गंगाधर झांबरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारुदत्त पवार आणि बबन पानसंबळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.