राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) ७ ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची कथित मोडतोड केल्याचा आरोप करत ‘ खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटावर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये बंदी घालण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राहुरीचे नायब तहसीलदार सोपान बाचकर आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘ खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करण्यात आले आहेत. या दाव्यांमध्ये, महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान होते, त्यांच्या अंगरक्षकांपैकी ११ मुसलमान होते, आणि महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती, अशा बाबींचा समावेश आहे.
चित्रपटाच्या शीर्षकात महाराजांचा एकेरी आणि अपमानकारक उल्लेख असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे शिवभक्त आणि इतिहासप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे, सकल हिंदू समाजाने या चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालकांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, वितरक आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर अफवा पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा अपमान करणे, आणि धार्मिक स्थळांबाबत खोटी माहिती देणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.