अहिल्यानगर वेब प्रतिनिधी,०४ ऑगस्ट : छत्तीसगड राज्यात ११ वर्षांपासून महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी भुवन पुरुषोत्तम पांडे याला तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. भुवन पांडे हा मागील ११ वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील तेंदुकोना पोलीस स्टेशन, जिल्हा महासमुंद येथे भुवन पुरुषोत्तम पांडे (वय ५१) याच्या विरोधात सन २०१४ आणि २०१६ मध्ये भादंवि कलम २९४, ५०६, ३६३, ३७६, ३२३ सह पोस्को कलम ६ अन्वये गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमध्ये तो सतत गैरहजर राहत असल्याने महासमुंद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याच्या विरोधात स्थायी वॉरंट काढले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून भुवन पांडे छत्तीसगड पोलिसांना सापडत नव्हता.
आज, ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बुंदेली चौकी, तेंदुकोना पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार इंद्रजीत ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल हिवराज कुन्हे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी फरार आरोपी भुवन पुरुषोत्तम पांडे याचा शोध घेण्यासाठी लेखी विनंती केली.
पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ सेक्टर ड्युटीवरील पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख आणि महेश पाखरे यांना छत्तीसगड पोलिसांसोबत आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख आणि महेश पाखरे यांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने भुवन पुरुषोत्तम पांडे याला शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचे नाव भुवन पुरुषोत्तम पांडे, वय ५१ वर्ष, मूळ रा. घर नं. ६९, वॉर्ड नं.१४, गाव फरदोहा, ता. पिठोरा, जिल्हा महासमुंद, राज्य छत्तीसगड आणि सध्या रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर असे सांगितले. त्याने त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्याला पुढील कार्यवाहीसाठी छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती (नगर शहर विभाग) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ शफी शेख आणि पो.कॉ महेश पाखरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.