राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे )१ ऑगस्ट : – अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र राहुरी बस स्थानकावरून एका अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी अकोले येथील भाजीपाला व्यावसायिक पूनम सोमनाथ डहाळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी पूनम डहाळे, त्यांचे पती सोमनाथ डहाळे आणि त्यांचे नातेवाईक अकोले येथे जाण्यासाठी राहुरी बस थांब्यावर आले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-अकोले बसमध्ये चढत असताना, बसच्या दरवाज्याजवळ असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पूनम डहाळे यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पळ्या आणि पाच मणी असलेले, अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.
पूनम डहाळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.