राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे), ३१ जुलै:-
राहुरी पोलीस स्टेशनने बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत, या प्रकरणात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे देखील उपस्थित होते. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, तसेच पोलीस अंमलदार विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, अंकुश भोसले, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, आदींचा गौरव करण्यात आला.
राहुरी पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या बनावट नोटांच्या रॅकेटमुळे परिसरातील आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या कामगिरीबद्दल सर्वत्र राहुरी पोलिसांचे कौतुक होत आहे.