राहुरी वेब प्रतिनिधी, २८ जुलै ( शरद पाचारणे ): सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सर्पमित्र सचिन गिरी यांनी सापांविषयीचे समज-गैरसमज दूर करण्यावर एक महत्त्वपूर्ण प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजाती, विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
गिरी यांनी सापांचे राहणीमान आणि त्यांचे खाद्य यावर प्रकाश टाकत, उंदीर हे सापांचे आवडते खाद्य असल्याचे सांगितले. उंदरांची संख्या वाढल्यास धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते आणि ही संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी साप निसर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे, असे आवाहन त्यांनी केले. सापांना न मारता, सर्पमित्रांना बोलावून त्यांना निसर्गात मुक्त करावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सर्पदंश झाल्यास काय करावे, याबद्दल मार्गदर्शन करताना सचिन गिरी म्हणाले की, चुकून सर्पदंश झाल्यास कोणत्याही मंदिरात किंवा मांत्रिकाकडे न जाता तातडीने योग्य तो औषधोपचार घ्यावा. यामुळे निश्चितच रुग्णाला जीवदान मिळते. सापांचे विष विविध औषधांमध्ये गुणकारी असल्यामुळे विषारी सापांचेही निसर्गात जगणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी वर्गात सापांविषयीची जागरूकता वाढली आणि त्यांचे अनेक प्रश्नही मार्गी लागले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांनी भूषवले. त्यांनी यावेळी बोलताना, सापांविषयीचे गैरसमज आणि समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “साप दूध कधीच पीत नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे,” असे आवाहन करत, सर्पदंश झाल्यास संबंधित व्यक्तीला दवाखान्यात नेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात सर्पमित्र तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, जितेंद्र मेटकर, वसंतराव झावरे, किरण गायकवाड, हलीम शेख, तुकाराम जाधव, संतोष जाधव, घनश्याम सानप, अनघा सासवडकर, सुरेखा टेमकर, संगीता नलगे, गोकुळ ठाकुर, बाबासाहेब शेलार इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी मानले.