भेसळयुक्त पशुखाद्य विक्रीवर कारवाईची मागणी; पालकमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश

राहुरी वेब प्रतिनिधी,७ जुलै ( शरद पाचारणे ): राज्यात, विशेषतः ग्रामीण भागांत, भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाच्या आणि विनापरवाना पशुखाद्यांची सर्रास विक्री होत असल्याने जनावरांच्या आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी या प्रकरणी संबंधित ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विकल्या जाणाऱ्या पशुखाद्यांमध्ये युरिया, मेलामाईन, दारू कारखान्याचे वेस्ट (DDGS), प्लास्टिक आणि इतर हानिकारक घटक आढळून येत आहेत. यामुळे गायींना गंभीर आजार होत असून, त्यांच्या किडनी, यकृत, प्रजनन आणि चयापचय प्रणालीवर दुष्परिणाम होत आहेत. अशा गायींपासून मिळणारे दूध मानवी आहारासाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका निर्माण होत आहे.

असोसिएशनने केलेल्या प्रमुख मागण्या:

BIS प्रमाणित नसलेल्या पशुखाद्यांवर त्वरित बंदी घालावी.

जिल्हास्तरावर तपासणी पथके नेमून पशुखाद्यांची साठवणूक, विक्री आणि उत्पादन यांची नियमित तपासणी करावी.

ज्या विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने आणि BIS मान्यता नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

शेतकऱ्यांना अधिकृत आणि गुणवत्तापूर्ण पशुखाद्य कसे ओळखावे, यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.

राज्यभर यासंबंधी हेल्पलाइन किंवा ऑनलाइन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू करावी.

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी आणि पशुधन, ग्रामीण आरोग्य, अन्नसुरक्षा व शेतीप्रधान अर्थव्यवस्थेवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिनापरवाना आणि भेसळयुक्त पशुखाद्य विक्री करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनचे दीपक लांडगे, केशव शिंदे, बाबासाहेब चिडे आणि बाळासाहेब जाधव या प्रतिनिधींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *