राहुरी वेब प्रतिनिधी,०१ (शरद पाचारणे ) :- रविवार दिनांक २९ जून रोजी येथील निनाद फाउंडेशन संचलित निनाद संगीत विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे “स्वरानुभूती” चे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन व आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पवन श्रीकांत नाईक यांची स्वरानुभूती संगीत मैफल अशा दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला. निमित्त होते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये यश संपादित केलेल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संगीत गायक व वादक, विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्या अनुषंगाने ज्येष्ठ कलाकारांची कला प्रस्तुती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व ख्यातनाम गायक पवन श्रीकांत नाईक यांचे हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. पवन कुलवाल, डॉ. अधीर आहेर, श्री.प्रकाश मोरे, संगीत शिक्षक डॉ. मनोज तेलोरे, राजेंद्र कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पूरवार्धात निरंजन कुसळकर, आदित्य लांडगे, अर्णव कोकणी यांचे समूह तबला वादन झाले. यांनी ताल तीनतालात पारंपारिक सादरीकरण केले. नंतर सुबोध गायकवाड याने राग भूप बंदिश, सिद्धी देवरे हिने राग यमन व सांज ये गोकुळी (भावगीत) तसेच भीमपलास या रागात समूह गायन करताना सई देशमुख, नम्रता कुसळकर, अक्षरा कुलकर्णी यांनी छोटा ख्याल, सरगम गीत व सुंदर ते ध्यान हे भजन इ रचना सादर केल्या.
स्वरानुभूती या द्वितीय विशेष सत्रात पवन नाईक यांनी तूम बिन चैन, लट ऊलझी, भोला शंकर, अलबेला सजन, बाहुली आली, नाई बा कृष्णा, किन्ना सोणा व सासो की माला अशा रचना सादर केल्या. राग शिवरंजनी, अहिर भैरव, मिश्र किरवाणी, बिहाग, राग गौरी अशा विविध रागातील ख्याल, भक्तिगीते, गवळण, भारूड व सूफी रचनांनी विद्यार्थी तसेच श्रोते मंत्रमुग्ध झाले.
साथसंगत कल्याण मुरकुटे (संवादिनी), शेखर दरवडे (तबला) तसेच नवरतन वर्मा, संकेत गांधी, श्रेयस शित्रे, पवन तळेकर व जयंत पाठक (सहगायन) यांनी साथसंगतीतून विशेष रंगत भरली.मनोज तेलोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेंद्र कोतकर यांनी आभार मानले. कार्यक्रम सूत्रसंचालन राजेंद्र कोतकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ साळवे, डॉ. जयंत कुलकर्णी, राजेंद्र नेवासकर, कमलाकर इंगळे, बापुसाहेब तेलोरे, बबन साळवे, महेश बिडवे, सुदाम कोहकडे, शुभदा कुलकर्णी, प्राची गायकवाड, डॉ. शुभदा खरे, संध्या जोशी , डाॅ.अशोक कुसळकर व डाॅ.दीप कुसळकर आदींचे सहकार्य लाभले. पांडुरंग कुसळकर, भगवान देशमुख, संदीप लांडगे, विवेकानंद कुलकर्णी, नंदकुमार भुते, गणेश गायकवाड, मुकेश कोकणी, दिलीप कुलकर्णी, रविंद्र देवरे, सुभाष घोडके, भाईदास देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.