रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळेल: राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, १ जुलै (वेब टिम ):-
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबुतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरू केली. सलग चार वेळा ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रियेला पुढे नेण्याचा मोठा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

महायुती सरकारमध्ये विविध मंत्रीपदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरिक हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. सरकार आणि संघटना यात योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम असे पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विधानसभेप्रमाणेच भारतीय जनता पक्ष प्रथम स्थानावर यश मिळवेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *