बुद्ध हे मानवाचे पूर्ण विकसित रूप आहे :भदंत सचित बोधी 

राहुरी वेब प्रतिनिधी ,१३( शरद पाचारणे )- 

भगवान बुद्ध हे मानवाचे अंतिम आणि संपूर्ण विकसित रूप असल्याचे प्रतिपादन पुणे येथील भदंत सचित बोधी यांनी केले. ते राहुरी येथील धम्म बांधवांनी आत्मा मालिक सभागृहात आयोजित केलेल्या 2569 व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचनात बोलत होते.

भदंत पुढे म्हणाले की, 2600 वर्षांपूर्वी सांगितलेला भगवान बुद्धाचा धम्म आजही ताजातवाना, टवटवीत असून अखिल मानवाच्या विकासासाठी उपयुक्त आहे. आजच्या जगात भगवान बुद्धांचेच तत्त्वज्ञान जगाला तारू शकेल. कारण या तत्त्वज्ञानात सत्य, अहिंसा, प्रेम, सुख शांती, स्वातंत्र्य ,समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आहे. भारतातून नाहीसा झालेला बुद्ध विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा भारतीयांच्या हातात दिला. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने जगातील अनेक देशांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. भारत मात्र बुद्धाचा देश असूनही जातीयता, धर्मांधता, विषमता, कमालीचे दारिद्र्य आणि जातीय दंगलींशी लढा देत आहे. हा लढा बुद्धाच्या तत्त्वज्ञानानेच यशस्वी होऊ शकतो. 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित बौद्ध बांधवांनी वंदन केले.भदतांकडून त्रिसरण पंचशील ग्रहण केले. तदनंतर बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, त्रिरत्न वंदना यांचे पठण करण्यात आले. प्रसंगी

धम्माच्या प्रचार प्रसारास गती देणारे बौद्धाचार्य सत्येंद्र तेलतुंबडे, बौद्धाचार्य विजय भोसले आणि बौद्धाचार्य संजय संसारे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी पहेलगाम घटनेत शहीद झालेले पर्यटक, सैनिक आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष के.आर पडवळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संजय संसारे यांनी करून विजय भोसले यांनी उपस्थित यांचे आभार मानले. 

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सताप्पा खरबडे  यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ओहोळ ,डॉ. प्रवीण क्षीरसागर, डॉ रमेश गायकवाड, प्राचार्य सुभाष पोटे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एम एम पाचारणे,मधुकर साळवे, प्रा. मेघराज बचुटे, अविनाश ओहोळ, साहित्यिका मनीषा गायकवाड- पटेकर, सुभाष भिंगारदिवे, प्रमोद भिंगारदिवे, मधुकर विधाते, डॉ मनीषा क्षीरसागर, मुख्याध्यापिका शिल्पा खरात, कुसुम सगळगिळे , माधवराव विधाते, रोहित तेलतुंबडे, राजेश जाधव, भगवान कर्डक, राजेंद्र पटेकर, अजय साळवे, एलआयसी चे अजिंक्य शिंदे, प्रतीक रूपटक्के, प्रशांत सातपुते, ग्रामसेवक साळवे, इंजि. विवेक सगळगिळे, सतीश गांगुर्डे, इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. भगवान बुद्धांना पुष्प अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. सरणात्तय  होऊन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर बौद्ध बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत जगाच्या कल्याणासाठी मंगल मैत्री भावना केली. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड आणि धम्म बांधवांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *