पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

अहिल्यानगर वेब टिम दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदी उपस्थित होते.

क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रुपडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदाई यांचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला.

चारही खेळाडूंनी अतिशय कष्टाने साध्य केलेले यश खूप महत्वपूर्ण आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील चार खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान व्हावा ही बाब अतिशय भूषणावह असून या यशाने जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळविलेले हे यश इतरांनाही प्रेरक असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले, सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन स्तरावरून होत आहे. जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकारांना पाठबळ देण्यसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून करण्यात येत असून यापुर्वी राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी मॅटची उपलब्धता करून देण्यात आली होती. शहरातील क्रीडा संकुलाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याने सर्व सुविधांनी परीपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *