राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) – येथील साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेला सलग आठव्यांदा राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला आहे. महाराष्ट्रात संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी बँक ब्लू रीबन पुरस्कार दिला जातो. यंदाही या पुरस्काराचे आयोजन ॲन्बीव्हॅली येथे करण्यात आले होते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे सलग आठव्यांदा हा पुरस्कार साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेला मिळालेला आहे. समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये या पुरस्कारासाठी शंभर ते दोनशे कोटी ठेवी या गटात प्रथम क्रमांकासाठी या संस्थेची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मा. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सदर पुरस्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी स्वीकारला आहे. या संस्थेने संस्थेच्या स्थापनेपासून केवळ अर्थकारणच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला वेगळा ठसा निर्माण केल्यामुळे व इतरांना आदर्शवत काम केल्यामुळेच या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे. यावेळी कपाळे यांनी सांगितले की हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. संस्थेच्या प्रगती बरोबरच सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे हित जोपासण्याचे काम आम्ही गेली बारा वर्षापासून करत आहोत. त्यासाठी आम्ही अहोरात्र झटून संस्था प्रगतीपथावर नेलेली आहे. त्यामुळे ठेवीदार कर्जदार सभासदांचा विश्वास जपण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी मला संचालक मंडळ, कर्मचारी, कलेक्शन एजंट, सभासद, ठेविदार, खातेदार यांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे. त्यांनी संस्थेवर मोठा विश्वास नेहमी टाकलेला आहे. त्यास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. येत्या कालावधीमध्ये 200 कोटीचा पल्ला आम्ही नक्कीच पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .हा सन्मान स्वीकारताना संस्थेचे संचालक बाळासाहेब तांबे, किशोर थोरात, रामचंद्र काळे, डॉ. विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.