राहुरी वेब प्रतिनिधी,२३ (शरद पाचारणे )-
साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेस नुकताच बँको ब्लु रिबन पतसंस्था पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन्स व पुणे येथील गॅलेक्सी इनमा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या बँको पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये बँको पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटची निवड करण्यात आली आहे .या पुरस्काराचे वितरण 31 जानेवारी रोजी लोणावळा येथील अंबिव्हॅली सिटी येथे करण्यात येणार आहे .पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले की हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी गेल्या 11 वर्षापासून आम्ही अविरतपणे प्रयत्न करत आहोत यामध्ये संचालक मंडळ, कर्मचारी, पिग्मी एजंट यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे त्यास आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.