राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०३ ऑक्टोबर : कनगर शिवारातून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा राहुरी पोलिसांनी यशस्वीरित्या शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. या कामगिरीमुळे राहुरी पोलिसांचे आणि विशेषतः पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी कनगर शिवारातील एक अल्पवयीन मुलगी शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घरातून गेली, पण ती परत आली नाही. पालकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी तात्काळ सुरू केला. गुन्ह्यात कोणतेही ठोस पुरावे नसताना, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेतला आणि गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी तिला शोधून काढून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
या यशस्वी कामगिरीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हवालदार रामनाथ सानप, बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद यांचा सहभाग होता. तसेच मोबाईल सेल्स रामपूरचे सचिन धनाड आणि संतोष दरेकर यांनीही तपासात मोलाची मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत एकूण ९० अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि संवेदनशीलतेमुळे पालक वर्गातून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.