महावितरणच्या ऑफिसवर चोरट्यांचा डल्ला – आठ हजारांचा मुद्देमाल पळविला
राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)०१ ऑक्टोबर : महावितरण शाखा कार्यालय (पोल फॅक्टरी) येथून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ हजार रुपयांचे कंडक्टर (तार) व केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहाय्यक अभियंता सतीश अशोकराव चारभे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२९ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी सहा वाजता कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर कर्मचारी प्रदीप अडसुरे यांनी रात्री अकरा वाजता कार्यालयाला कुलूप लावले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहाय्यक अभियंता चारभे ऑफिसला आले असता, दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
तपासणी केली असता, ऑफिसमधील कंडक्टर (तार) (अंदाजे ३०० मीटर लांबीची) व काळ्या रंगाची पाच मीटर केबल गायब असल्याचे आढळले. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे आठ हजार रुपये असून अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगें यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.