राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)०१ ऑक्टोबर : राहुरी तालुक्यातील कामगार तलाठी, ग्रामसेवक, सीएससी सेंटर चालक व सेतूचालकांकडून अवैधरीत्या पिकांच्या पंचनाम्यासह शासकीय कामांची फोटोग्राफी केली जात असल्याबद्दल “राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या” वतीने तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. यासंदर्भात संस्थेने बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राहुरीचे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिले.
संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे की, पंचनामेचे फोटो काढण्याचा कायदेशीर अधिकार फोटोग्राफरशिवाय इतर कोणालाही नाही. तरीही सीएससी व सेतू केंद्र चालक, तसेच काही शासकीय कर्मचारी शेतात जाऊन मोबाईलने फोटो काढत आहेत. त्यांना फोटोग्राफीचे ज्ञान नसल्याने फोटोमध्ये त्रुटी राहतात व त्याचा थेट तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या चुकीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून अधिकृत फोटोग्राफर बांधवांना कामापासून वंचित केले जात आहे.
“आम्ही वर्षानुवर्षे पंचनामे, निवडणुका, घरकुल योजना, शासकीय कामे अशा सर्व क्षेत्रात अधिकृत फोटोग्राफीची सेवा पुरवतो. पण अवैधरीत्या फोटोग्राफी करणाऱ्यांमुळे आमच्या रोजीरोटीवर गदा येत आहे. जर यावर त्वरित आळा घालण्यात आला नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये व शासकीय योजनांमध्ये आम्हीही सहकार्य करणार नाही,” असा इशारा संस्थेने दिला आहे.
या निवेदनावर राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुलदीप नवले, उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सचिव बाबासाहेब नेहे, तसेच धनंजय गुलदगड, भास्कर तनपुरे, संजय गायकवाड, काका गडदे, सनी भोसले, राजा भोरे, महेश शिंदे, अक्षय नारद, अमित शेलार, संतोष पवार आदींसह अनेक फोटोग्राफरांच्या सह्या आहेत.