राहुरी (वेब प्रतिनिधी शरद पाचारणे) दि. २९ सप्टेंबर :– “रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरलेला गड आहे. तोच खरा धर्मतीर्थ आहे,” असे प्रतिपादन ह. भ. प. भारत महाराज जाधव (कैकाडी महाराज मठ, पंढरपूर) यांनी केले.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त ‘शिवशंभू प्रतिष्ठान’ आयोजित ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’ अंतर्गत रायगड गडकोट दर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या नियोजनासाठी राहुरी येथील धर्मराडी गेस्ट हाऊस येथे बैठक घेण्यात आली.
या वेळी मार्गदर्शन करताना भारत महाराज म्हणाले की, “धर्माच्या नावाखाली खोटा धर्म सांगून समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्म व जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. संतांच्या विचारातून स्वराज्य निर्माण झाले आणि स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधान निर्माण झाले आहे. म्हणूनच संविधान दिनाच्या दिवशी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे.”
बैठकीस मा. विलास ढोकणे, मा. भरत धोत्रे, सुरेश चौधरी, मा. मच्छिंद्र ढोकणे, संजय खर्डे, मा. भास्कर गाडे, मा. मंजाबापू कोबरने, मा. भगवान खर्डे, मा. मन्सूर पठाण, मा. दीपक पंडित, मा. नवनाथ ढोकणे, मा. अभिजित दुशिंग, मा. तुषार ढोकणे, मा. भास्कर वायळ, शांताराम आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन शिवशंभू प्रतिष्ठान, अहिल्यानगर तर्फे करण्यात आले.