राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे), दि. 29 सप्टेंबर, 2025 :
चिकण मातीच्या कणांमुळे मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते तसेच रासायनीक खतांचा कार्यक्षमपणे वापर होतो. त्याचबरोबर मातीमधील प्रदुषण थांबविणे शक्य होते. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्ये आवश्यक असतात. चिकण मातीच्या कणांमुळे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य रितीने होते. अशा प्रकारे चिकण मातीच्या कणांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राहुरी चॅप्टर, भारतीय मृदा शास्त्र संस्था, मृदाशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील भारतीय मृदाशास्त्र संस्था, 31 वे डॉ. डी.पी. मोतीरमाणी मेमोरीयल व्याख्यान-2025 च्या अंतर्गत माती-वनस्पती प्रणालीतील बहुकार्यात्मक चिकणमाती खनिजे ः यंत्रणा, बदल आणि अनुप्रयोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा शास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. के.एम. मनजहा उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके व मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. के.एम. मनजहा आपल्या भाषणात म्हणाले की चिकणमातीचे कण आणि नॅनो खतांचा वापर करुन खते निर्मिती करणे व त्याचा पीक उत्पादनासाठी वापर करता येतो. सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्यांचा वापर करुन विविध प्रकारच्या जमिनींमध्ये पीक उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. चिकण मातीचे कण हे नॅनो खतांद्वारे तयार केलेल्या खतांमुळे होणारे वातावरणीय प्रदुषण कमी करु शकतात. खत वापरामध्ये 20 टक्क्यांपर्यंत खतांची बचत होऊ शकते तसेच जडधातूंमुळे होणारे प्रदुषण कमी करता येते. त्यांनी यावेळी मातीची संरचना, त्यामध्ये होणारे बदल, चिकण मातीच्या कणांची निर्मिती व उपयोग याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भिमराव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितू ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध विभाग प्रमुख, पुणे, धुळे, कोल्हापूर व हाळगाव येथील मृदाशास्त्रज्ञ, विद्यापीठातील मृदाशास्त्र विभागातील प्राध्यापक, आचार्य व पदव्युत्तर पदविचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.