श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे राहुरीत दुर्गामाता दौड जल्लोषात

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)२८ सप्टेंबर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीला राहुरी शहरात उत्साही प्रतिसाद मिळत असून नवरात्रीचे नऊही दिवस पहाटे ही दौड पारंपरिक जल्लोषात निघते.

पहाटे सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करीत ही मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करते. भगव्याच्या झेंड्यांनी नटलेली ही दौड राहुरीकरांचे लक्ष वेधून घेत असून शहरातील विविध भागांतून उत्साहपूर्ण स्वागत केले जाते. महिलावर्ग या भगव्या ध्वजाचे औक्षण करून ओवाळणी करीत परंपरेला साजेशी श्रद्धा व्यक्त करतात.

लहान मुलांपासून तरुणाई आणि युवतींपर्यंत सर्वांचा सहभाग या दौडीत दिसून येतो. देशहिताचे गीत, पद्य व घोषणांनी वातावरण दुमदुमून जाते. ‘श्री शिवाजी, श्री संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी, सदृढ व्हावी व देव-देश-धर्म रक्षणासाठी सज्ज राहावी’, हा संदेश या उपक्रमातून दिला जातो.

हिंदू ग्रुप राहुरी शहरासह अखंड हिंदू समाजातील कार्यकर्त्यांचा यात मोठ्या संख्येने सहभाग असतो. देशभर ज्या ज्या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य चालते, तिथे या मिरवणुका नवरात्रीत निघतात. राहुरीतही या दौडीचे स्वागत जयघोष व टाळ्यांच्या गजरात करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *