राहुरीत नाथ प्रतिष्ठानतर्फे भव्य रास-दांडिया महोत्सवाला उत्साहात सुरुवात

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२६ सप्टेबर : राहुरी शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था नाथ प्रतिष्ठान तर्फे आयोजित भव्य रास-दांडिया महोत्सवाला शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) उत्साही सुरुवात झाली. हा महोत्सव ३० सप्टेंबरपर्यंत दररोज रंगतदार कार्यक्रमांसह पार पडणार असून, शहरातील महिलांसाठी आणि मुलींसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

या महोत्सवात मुलींसाठी सायं. ७ ते ८.३० आणि महिलांसाठी रात्री ८.३० ते ११ या वेळेत दांडिया-गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून रंगीबेरंगी वातावरणात नृत्याचा जल्लोष साजरा केला.

नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक आणि युवा नेते सौरभ उंडे यांनी सांगितले की, “हा दांडिया महोत्सव कोणत्याही वर्ग, जात, धर्माच्या सीमा न मानता सर्वांसाठी खुला आहे. प्रत्येक महिलेला त्याचा मनमुराद आनंद घेता यावा हा आमचा उद्देश आहे.”

सध्याच्या नवरात्रोत्सवात गरबा-दांडियाला विशेष महत्त्व असून, अनेक ठिकाणी हे कार्यक्रम केवळ विशिष्ट गटापुरते मर्यादित राहतात. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून नाथ प्रतिष्ठान सातत्याने सर्वसमावेशक दांडिया महोत्सवाचे आयोजन करून सामाजिक समता आणि महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून देत आहे.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकता, आनंद, संस्कृतीबद्दल अभिमान आणि सार्वजनिक सहभागाची भावना वाढीस लागली आहे. भविष्यात या महोत्सवाचा आवाका अधिक वाढवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *