राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२६ सप्टेबर : मुलीला मारहाण केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावर जावयाने लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर २०२५) सायंकाळी घडली. या हल्ल्यात सासरे गंगाधर चिमाजी बाचकर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जावई, व्याही आणि सासू यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोटुंबे आखाडा, ता. राहुरी येथील रहिवासी गंगाधर चिमाजी बाचकर यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी वनिता बरे हिचा त्यांना फोन आला. वनिताने सांगितले की, ती बहिणीसोबत फोनवर बोलत असल्यामुळे तिचा नवरा श्रीकांत मच्छिंद्र बरे याने तिला मारहाण केली आहे. त्यामुळे तुम्ही लवकर या.
वडिलांनी मुलीच्या सांगण्यावरून सायंकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास वरवंडी, ता. राहुरी येथे असलेल्या मुलगी वनिता हिच्या घराबाहेर धाव घेतली. तेथे जावई श्रीकांत मच्छिंद्र बरे, व्याही मच्छिंद्र विठ्ठल बरे आणि मुलीची सासू जिजा मच्छिंद्र बरे हे तिघे उपस्थित होते.
गंगाधर बाचकर यांनी घराबाहेरूनच उभे राहून, “तुम्ही माझ्या मुलीला मारहाण का केली?” असा जाब विचारत असताना, पाठीमागून जावई श्रीकांत बरे याने हातातील लोखंडी गज घेऊन त्यांच्या दिशेने धावत आला. त्याने सासरे गंगाराम बाचकर यांच्या डोक्यात गजाने मारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मध्ये हात घातला. गजाचा फटका त्यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर बसला. यात गंगाधर बाचकर हे जखमी झाले.
त्याचबरोबर, जावई श्रीकांत मच्छिंद्र बरे, व्याही मच्छिंद्र बरे आणि सासू जिजा मच्छिंद्र बरे यांनी बाचकर यांना शिवीगाळ करत, “तू परत आमच्या दारात आलास तर तुला जीवच मारून टाकू” अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या गंभीर घटनेनंतर गंगाधर चिमाजी बाचकर यांच्या फिर्यादीवरून श्रीकांत मच्छिंद्र बरे, मच्छिंद्र विठ्ठल बरे आणि जिजा मच्छिंद्र बरे (तिघे रा. वरवंडी, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.