राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१४ सप्टेबर :
“तू आमच्याकडे पाहून का सारखा खोकत असतो” असे म्हणत चौघा जणांकडून राजेंद्र पांडुरंग गुंजाळला गजाने व लाकडी काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे घडली.
याबाबत राजेंद्र पांडुरंग गुंजाळ (रा. आरडगाव) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते घरासमोर झोपलेले असताना तब्येतीमुळे खोकत होते. त्या वेळी मच्छिंद्र पोपट जाधव हा रस्त्याने जात असताना, “तू मला पाहून का खोकला?” असे म्हणत त्याने वडील, भावंडांना बोलावून घेतले.
त्यानंतर मच्छिंद्र पोपट जाधव, बंडू मच्छिंद्र जाधव, गोरख पोपट जाधव व सुमित गोरख जाधव (सर्व रा. आरडगाव) यांनी शिवीगाळ करून राजेंद्र गुंजाळ यांना बेदम मारहाण केली. यामध्ये सुमित जाधवने गजाने उजव्या हातावर वार केला, बंडू जाधवने छातीवर लाकडी काठीने प्रहार केला, मच्छिंद्र जाधवने पाठीवर काठीने मारले तर गोरख जाधवने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.