राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२२ ऑगस्ट : प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त राहुरी येथील राजयोग भवन येथे शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी एका विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील ६००० सेवा केंद्रांवर ‘विश्वबंधुत्व दिना’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान अभियानाचा हा एक भाग होता.
या शिबिराचे उद्घाटन राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण क्षीरसागर, अहिल्यानगर येथील जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. विलास मढेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनेक पत्रकारही उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राजयोग भवनच्या या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, अध्यात्म आणि आत्म्याचा प्रचार करण्याबरोबरच त्यांनी रक्तदान शिबिराची जोड दिली आहे. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. मढेकर यांनी रक्तदात्यांना ‘रक्तपेढीचा आत्मा’ असे संबोधले. ते म्हणाले की, रक्तदानाने रुग्णांना जीवनदान मिळते आणि अशा शिबिरांचे आयोजन करणारे संयोजक यात मोठे योगदान देतात.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. क्षीरसागर, पत्रकार वसंतराव झावरे, पत्रकार प्रसाद मैड यांनीही मनोगत व्यक्त केले. राजयोग भवनच्या नंदादीदींनी या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘विश्वबंधुत्व दिवस’ मानला जातो, ज्याअंतर्गत देशभरात महारक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व प्रकाशमणी दीदींच्या नावाने स्मृति असलेले कप देण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, गणेश वाघमारे, डॉ. प्रवीण क्षीरसागर, डॉ. विलास मढीकर, पत्रकार वसंतराव झावरे, राजेंद्र परदेशी, अनिल कोळसे, आप्पासाहेब मकासरे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. मुनोत, पवळ सिस्टर, मेघा शिंदे, प्रीती चिपाडे, खरपुडे, ब्रह्माकुमारी नंदा दीदी, पूनम दीदी, मंगल दीदी, तसेच ब्रह्मा कुमार महेश भाई, बाळू भाई, आर. टी. ओ. संजय गोसावी, रवि भाई, संदीप भाई, युगंधारा ग्रुपच्या विद्या करपे, संगीता हारदे आणि ओम शांती परिवारातील सदस्य उपस्थित होते.