चास घाटात दरोड्याच्या तयारीत असलेले सात आरोपी नगर तालुका पोलीसांकडून जेरबंद

अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी (शरद पाचारणे )२१ ऑगस्ट : नगर-पुणे रोडवरील चास घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून मारुती सुझुकीचा कॅरी टेम्पो, दरोड्यासाठी लागणारी हत्यारे आणि मोबाईल असा एकूण ३ लाख ८८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२० ऑगस्ट) रात्री करण्यात आली.

नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी तपास पथकाला चास घाटात गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ यांच्यासह एक पथक रात्री गस्त घालत असताना चास शिवारातील हॉटेल श्रेयाजवळ एक मारुती सुझुकी कॅरी टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा दिसला. टेम्पोजवळ कोणीही नसल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी आजूबाजूला पाहणी केली असता रोडच्या कडेला झुडपात काही लोक लपून बसलेले दिसले. त्यापैकी दोघांच्या हातात लोखंडी पहार होती. पोलिसांनी तात्काळ त्या दोघांना पकडले. त्याचवेळी झुडपांमध्ये लपलेले इतर पाच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांनाही ताब्यात घेतले.
राहुल संतोष गायकवाड (वय २२),आकाश अनिल धोत्रे (वय १९),गणेश भीमराव पवार (वय १९),पवन भाऊसाहेब ढमढेरे (वय २१),सनी शामराव पवार (वय २३) (सर्व रा. बुरुडगाव, ता. नगर, जि. अहमदनगर) जय दिलीप बागुल (वय १९),अक्षय राजू देठे (वय २५) (दोघे रा. शेंडी, ता. नगर, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आलेल्या आलेली आहे .

पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी पहार, एक धारदार चाकू, हातोडी, दोन लोखंडी छिन्या, दोन लोखंडी पाने आणि एक हेक्सॉ ब्लेड पान अशी दरोड्यासाठी वापरली जाणारी हत्यारे सापडली. तसेच आठ मोबाईल आणि कॅरी टेम्पोसह एकूण ३,८८,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१० (४) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गिते, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड, सफौ. दत्तात्रय हिंगडे, सफौ. दीपक गाडीलकर, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ नितीन शिंदे, पोहेकॉ किशोर लाड, पोकों विजय साठे, पोकॉ आदिनाथ शिरसाठ, चापोकों विठ्ठल गोरे आणि चापोकों पोपट गिते यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *