राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे ) ,१३ ऑगस्ट : येथील शिवांकुर विद्यालयात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम आणि ऋणानुबंध वाढवणारा हा सण सर्वांनीच जपला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या हातावर राखी बांधून त्यांना औक्षण केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राखीचा आकार करून रक्षाबंधन साजरे केले. विद्यालयाच्या शिक्षिका सुजाता तारडे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
या सणानिमित्त विद्यालयात ‘राखी बनवा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर राख्या तयार केल्या.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, सौ. मंगलताई पवार, डॉ. गौरी पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा मकासरे यांनी केले, तर सुनीता ढोकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, तसेच इतर शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, बहुसंख्य पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.