राहुरी वेब प्रतिनिधी( शरद पाचारणे )१२ ऑगस्ट:-राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वार्षिक निवडणुकीत कुलदीप नवले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच बाबा जाधव उपाध्यक्ष, गणेश नेहे सचिव आणि दीपक गुलदगड यांची सहसचिवपदी निवड झाली. पांडुरंग लॉन्स राहुरी येथे ८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी असेल.
नवनिर्वाचित संचालक मंडळ
या निवडणुकीत विविध गटांसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाचीही घोषणा करण्यात आली. यात सोनगाव सात्रळ गटातून किरण शिंदे, राहुरी फॅक्टरी गटातून महेश शिंदे, कोल्हार गटातून मंगेश गाडेकर, देवळाली गटातून गणेश कुंजीर, टाकळीमिया गटातून अमीन शेख, आरडगाव गटातून उत्तम बनसोडे, केंदळ मानोरी गटातून संतोष पवार, मांजरी वळण गटातून संजय आढाव, राहुरी शहर आणि वाघाचा आखाडा गटातून सचिन गाडे आणि नितीन सप्रे, बारागाव नांदूर मुळानगर खडांबे गटातून अभिमन्यू आघाव, मल्हारवाडी ताहाराबाद म्हैसगाव शेरी चिखलठाण गटातून संदीप घाडगे, गोटुंबे आखाडा पिंपरी अवघड सडे गटातून दिलीप शेटे, उंबरे गटातून संकेत येवले आणि वांबोरी ब्राह्मणी गटातून किशोर लहारे यांची सर्वानुमते निवड झाली.
ज्येष्ठ फोटोग्राफर नजीरभाई सय्यद, किरण शिंदे आणि वैभव धुमाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
माजी पदाधिकाऱ्यांचा गौरव
मागील वर्षी संस्थेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल माजी अध्यक्ष मच्छिंद्र विटनोर, उपाध्यक्ष जालिंदर गडदे आणि सचिव गणेश नेहे यांचा सत्कार करण्यात आला. या पदाधिकाऱ्यांनी संस्थेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, ज्यात सदस्यांसाठी ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, विविध कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रिकेट स्पर्धा आणि वृक्षारोपण यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यांच्या कायमस्वरूपी उत्कृष्ट कामगिरीमुळे गणेश नेहे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षांची आश्वासनं
अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलदीप नवले आणि उपाध्यक्ष बाबा जाधव यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी फोटोग्राफर्ससाठी “एग्रीमेंट फॉर्म”, हळदी समारंभातील फोटोग्राफीचा वेळ रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आणि नवीन तंत्रज्ञान व उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी नवीन फोटोग्राफर्सना संस्थेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय गुलदगड, नवनाथ बेंद्रे, नजीरभाई सय्यद आणि इतर अनेक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नेहे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक गुलदगड यांनी केले.