आषाढी वारी अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने मदत द्यावी – योगेश करपे यांची शासनाकडे मागणी

राहुरी वेब प्रतिनिधी, ७ (शरद पाचारणे ) :-  आषाढी वारी २०२५ दरम्यान, टाकळीमिया (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील श्री दत्त सेवा मंडळ यांच्या वारी मुक्कामादरम्यान करकंब–पंढरपूर रस्त्यालगत अक्षता मंगल कार्यालयाजवळ मोठा अपघात झाला या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाच वारकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा राज्य संपर्कप्रमुख योगेश गोरक्षनाथ करपे यांनी शासनाकडे केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून याबाबत निवेदन सादर केले.

गुरुवार दि.  ३ जुलै रोजी पहाटे ५:३० वाजता टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वारी मुक्कामादरम्यान, करकंब-पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या अक्षता मंगल कार्यालयाजवळ हा अपघात घडला. एका भरधाव अज्ञात पिकअप वाहनाने विठ्ठल माऊलीच्या रथासह ट्रॉलीला जोरदार धडक दिली, यात १. श्री. सुभाष सावराम चौधरी,२. श्री. दिलीप नाथा आडगळे,३. श्री. सुरेश देवराम पाचरणे,४. श्री. भाऊराव शेजुळ,५. श्री. देवराम निकम हे  पाच वारकरी गंभीर जखमी झाले

सर्व जखमींना करकंब येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात विठ्ठल रथ आणि ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडवल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, करकंब पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या दिनांक १ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार, आषाढी वारीत अपघातग्रस्त वारकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पुरवण्याची तरतूद आहे. याच तरतुदीचा आधार घेत योगेश करपे यांनी शासनाकडे १) सर्व जखमी वारकऱ्यांना तात्काळ वैद्यकीय व आर्थिक मदत मंजूर करावी.
२)एफआयआर, वैद्यकीय अहवाल आणि वारी सहभागाचे प्रमाणपत्र संलग्न करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करावा.३)संबंधित विभागांनी निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष निर्देश द्यावेत.४)जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी स्वतः जखमी वारकऱ्यांची हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी.५)अपघातग्रस्त रथ व ट्रॅक्टरच्या दुरुस्तीसाठी शासकीय मदत जाहीर करावी.या प्रमुख मागण्या केल्या आहेत:

वारकरी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा आत्मा आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने कार्यवाही करावी, अशी वारकरी बांधवांची आणि ज्ञानमाता सेवाभावी संस्थेची एकमुखी मागणी योगेश करपे यांनी केली.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, तसेच इतर संबंधित अधिकारी आणि मान्यवरांना पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *