राहुरी वेब प्रतिनिधी,१० (शरद पाचारणे )-
रस्ता सुरक्षा सप्ताह व पोलीस वर्धापन दिनाच्या औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत कुमार जोशी व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी देवळाली प्रवरा येथे सकाळी 11:15 ते 11:45 दरम्यान मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. सदर रॅलीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस मित्र, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, राहुरी तालुक्यातील नागरिक यांनी सहभाग नोंदवला. रॅली निघण्यापूर्वी रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियमन याविषयी अनंत कुमार जोशी उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी श्रीरामपूर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ट्राफिक जाम व रोड ट्राफिक एक्सीडेंट होण्याच्या मूळ कारणाची कारण मीमांसा मांडली. नवाळे मुख्याधिकारी देवळाली नगरपालिका, यांनी सीट बेल्ट हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत स्वतः शंभर टक्के सीट बेल्ट लावूनच प्रवास करणार असल्याबाबत संकल्प केला. अध्यक्षीय भाषणात राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी राहुरी तालुक्यात होणारे अपघात कमी होण्यासाठी सर्व प्रशासन कटिबद्ध राहून अपघाताची संख्या कमी करूया असा संकल्प केला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे,सचिन सानप, धीरज भामरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैष्णवी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सचिन चोथे ,ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक योगेश निकम ,कस्तुरी मोटर ड्रायव्हिंग स्कूलयांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. उपरोक्त सर्व प्रमुख पाहुण्यांनी सदर मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली व त्यात सुमारे 100 दुचाकी स्वारानी हेल्मेट परिधान करून सहभाग नोंदवला.