अहिल्यानगर वेब प्रतिनिधी –
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक आणि त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ वाघ यांची पाचवी पुण्यतिथी साजरी झाली. दिनांक 1 जानेवारी रोजी त्यानिमित्त त्यांच्या बुरुडगाव रोडवरील रायगड निवासस्थानी प्रतिमा पूजन झाले.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे आणि लखनऊ विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू, यशवंतराव चव्हाण व्यासपीठ चे अध्यक्ष डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव, सुपुत्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे, प्रा.पोपटराव काळे, प्रा.एल बी म्हस्के न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण गांगर्डे, डॉ. धनंजय वाघ, डॉ. सागर वाघ, संगीता वाघ, डॉ.सुमा वाघ, डॉ. मृणाल वाघ डॉ. कृतिका वाघ आणि परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.
त्यांचे पाचवे पुण्यस्मरण करताना कुलगुरू निमसे म्हणाले की, नगर मधील राजकीय सामाजिक शैक्षणिक उल्लेखनीय असे काम रामनाथ वाघ यांचे आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना 1972 च्या दुष्काळात त्यांनी नगर जिल्ह्यात 200 पाझर तलाव आणि नालाबंडिंग करून विक्रम केला. त्यावेळी साडेचार लाख लोकांना रोजगार हमीचे काम त्यांनी उपलब्ध करून दिले. या कर्तुत्वाची दखल घेऊन त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री यांनी विशेष पुरस्कार देऊन गौरविले. गोरगरीब घटकाला न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव असे काम केले. अनेकांचे संसार उभे केले. वांबोरी येथे मोठा निधी दिला. विकास कामात हातभार देऊन विविध संस्था उभ्या केल्या. वांबोरी उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करून त्यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले. वाघ परिवार त्यांचेच सामाजिक कार्य पुढे नेत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून चव्हाण आणि वाघ यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.