कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात खरीप आढावा व रब्बी नियोजन बैठक २०२४ संपन्न

राहुरी विद्यापीठ, वेब प्रतिनिधी दि. ३०( शरद पाचारणे )
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे खरीप आढावा व रब्बी नियोजन बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये विद्यापीठातील सर्व संशोधन केंद्रातील खरीप बीजोत्पादन पिकांचा आढावा घेण्यात येऊन रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व करडई या बीजोत्पादन पिकांचे मूलभूत, प्रमाणित, सत्यप्रत इ. वाणाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी व किती क्षेत्रावर घ्यावयाचे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सातप्पा खरबडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार उपस्थित होते. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की विद्यापीठाने कृषि मंत्रालय, भारत सरकार, महाबीज, बियाणे महामंडळ, यांच्याकडील रब्बी हंगामातील बियाणे मागणी लक्षात घेऊन जास्तीचे बियाणे उत्पादन तयार करून ते शेतकरी/खाजगी बीजोत्पादक कंपनी यांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. तसेच महाराष्ट्रातील वाढते डाळिंब पिकाचे लागवडीसाठी शेतकर्यांना चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे, कलमे रोपे विद्यापीठाने तयार करण्यासाठी टिशूकल्चर आधारित रोपांची निर्मिती करण्याकडे प्राधान्याने तयारी करण्याबाबत सूचना त्यांनी केली.
याप्रसंगी अहिल्यानगर महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. दौंड व राष्ट्रीय बीज निगमचे श्री. सौरदीप बोस यांनी बीजोत्पादन विषयक चर्चेत सहभाग नोंदवला. या बियाणे आढावा बैठकीचे सादरीकरण प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले यांनी केले. यावेळी उपसंशोधन संचालक, विविध विभागांचे विभाग प्रमुख, बीजोत्पादन अधिकारी डॉ. के.सी. गागरे, प्रा. बी.टी. शेटे, बियाणे विभागाचे सर्व प्रभारी अधिकारी, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बियाणे पैदासकार अधिकारी, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *