निळवंडेच्या पाण्याचा शेतीक्षेत्राला मोठा लाभ होईल – डॉ. सुजय विखे

संगमनेर वेब टीम दि. २२ – निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुयोग्य नियोजनामुळे पाण्याचा थेट लाभ शेतीक्षेत्राला होणार असल्याने गावाचे अर्थकारण प्रगतीच्या दिशेने जाईल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील निमगावजाळी आणि आश्वी येथे निळवंडे उजव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे गावातील बंधारे व तलाव भरल्याने परीसरातील शेतकार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यानिमित्त आयोजित जलपूजन कार्यक्रमात डॉ. सुजय विखे बोलत होते.

मागील अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा या भागातील शेतकऱ्यांना होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने कालव्यांची कामे मार्गी लागली. २०२४ पर्यंत पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान सर्वांना आहे, असे डॉ.सुजय विखे म्हणाले.

कालव्याच्या पाण्याचा लाभ थेट शेतीक्षेत्राला होणार असल्याने उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. गावाचे अर्थकारण यामुळे बदलेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. विकास कामांचा चढता आलेख शिर्डी मतदारसंघात कायम असून, रस्त्यांच्या कामांसह व्यक्तिगत लाभाच्या योजनांना लोकांपर्यंत पोहचविण्यात जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला जात आहे.

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबरच बचत गटातील महिलांच्या उत्कर्षासाठी विखे पाटील यांच्या पुढाकाराने योजना राबविल्या जात आहेत. शिर्डी येथे सुरू होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *