राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे): राहुरी पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना खात्यांतर्गत चौकशी सुरू करून निलंबित करण्यात आले आहे. सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस प्रमुख, अहिल्यानगर यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी या संदर्भात आदेश जारी केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे यापूर्वी सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत सोनई पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत त्यांना वेळोवेळी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांचे पालन न झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोनई पोलीस ठाणे हद्दीत अग्नीशस्त्रासह खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर विजय माळी यांच्याविरोधात खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान, विजय माळी यांची नुकतीच राहुरी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी येथे हजेरी लावली होती. सध्या अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली होती.या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.