राहुरी वेब प्रतिनिधी ,९ मार्च २६ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी श्री बुवासिद्ध देव महाराज यांच्या समाधी परिसरात वस्त्र पेटविल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करत या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल हिंदू समाज, राहुरी यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार व राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. ६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास श्री बुवासिद्ध देव महाराज यांच्या समाधीवरील वस्त्र एका अल्पवयीन मुलाने पेटविल्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्या दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत होती. मिरवणूक सुरू असताना मंदिर परिसरातील समाधीवरील वस्त्र पेटविल्याची बातमी शहरात पसरली असती, तर तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी संयम राखल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित मुलाला कोणी प्रवृत्त केले का, तसेच त्या वेळी परिसरात कोण-कोण उपस्थित होते याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.