तांदुळवाडीत गुणवंतांचा सत्कार; युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला सोहळा

राहुरी (प्रतिनिधी) – युवकांनी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. सोशल मीडियाच्या आहारी न जाता ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असे प्रतिपादन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.तांदुळवाडी (राहुरी स्टेशन) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. नॅशनल चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत १८ राज्यांमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांक पटकावणारा चि. सार्थक उत्तम बनसोडे, केंद्रीय राखीव सुरक्षा दलामध्ये (CRPF) निवड झालेला चि. सत्यम रायभान धसाळ तसेच तालुक्यातील स्केटिंग स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक ऋषिकेश तारडे यांचा तांदुळवाडी गावाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे होते, तर राहुरी तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की, “गावाची आणि समाजाची वाटचाल योग्य दिशेने व्हावी यासाठी युवकांनी सजग, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ राहणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून सातत्यपूर्ण मेहनत, सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य मार्गदर्शन यांची जोड आवश्यक आहे. सोशल मीडियामधील आकर्षणांना बळी न पडता वेळेचे व्यवस्थापन करत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्यास यश अटळ आहे.”ते पुढे म्हणाले की, “आजचा हा सत्कार समारंभ केवळ व्यक्तींचा गौरव नसून संपूर्ण गावासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सैन्य भरती किंवा इतर शासकीय सेवांसाठी तयारी करणाऱ्या युवकांना या यशकथा निश्चितच उर्जा देतील. समाजाने अशा गुणवंतांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.”नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गावातील ज्येष्ठ व्यक्तींचे अनुभव आणि मार्गदर्शन हे युवक पिढीसाठी दिशादर्शक ठरते. ज्येष्ठांना मान-सन्मान देण्याची तांदुळवाडी गावाची परंपरा कौतुकास्पद आहे. खेळाच्या माध्यमातून राज्यस्तरावर नावलौकिक मिळविणे हे गावासाठी अभिमानाची बाब आहे, तसेच विविध परीक्षांमधून शासकीय सेवेत प्रवेश मिळविणेही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.”त्या पुढे म्हणाल्या की, “गावपातळीवर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणारे, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारे आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत. अशा कार्यक्रमांमुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण होते.”कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब पेरणे यांनी गावातील युवकांनी विविध क्षेत्रात प्रगती करून गावाचे नाव उंचावल्याचा अभिमान व्यक्त केला. माजी संचालक शरदराव पेरणे, मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे यांनीही युवकांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा व सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.पत्रकार विनीत धसाळ यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, “हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित नसून इतर युवकांना प्रेरणा देणारा सामाजिक उपक्रम आहे. गावात विविध क्षेत्रात यश संपादन करणारे युवक हे गावचे वैभव आहेत आणि गावातील ज्येष्ठ हे आमचा अभिमान आहेत.”यावेळी चि. सार्थक बनसोडे, चि. सत्यम धसाळ व प्रशिक्षक ऋषिकेश तारडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा, तसेच महसूल विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल नायब तहसीलदार संध्या दळवी यांचा गावाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ भास्कर भिकाजी पेरणे, भास्कर काशिनाथ पेरणे, ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, बाळासाहेब पेरणे, शरदराव पेरणे, बाळासाहेब धसाळ, सर्जेराव पेरणे, अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल मोहनीराज होन, मोहन खाटेकर, रंगनाथ पेरणे, प्रभाकर म्हसे, मच्छिंद्र पेरणे, साहेबराव म्हसे, लक्ष्मण धागुडे, शिवाजी खडके, विक्रम पेरणे, लक्ष्मण पेरणे, रेवन्नाथ खडके, रावसाहेब पेरणे, रेवन्नाथ पेरणे, दत्तात्रय पेरणे, तात्यासाहेब धागुडे, भास्कर चव्हाण, बापूसाहेब म्हसे, संजय कदम, आयुब पठाण, प्रवीण धसाळ, अशोक तोडमल, प्रभाकर धसाळ, मच्छिंद्र चव्हाण, अविनाश पेरणे, स्वप्निल पेरणे, प्रसाद पेरणे, संजय धागुडे, संतोष माधव धसाळ, संतोष बाळासाहेब धसाळ, बबन डुक्रे, बादल शिंदे, शंकर लष्करे, कासिम शेख, लालखान शेख, प्रमोद खडके, किरण धसाळ, ओंकार म्हसे, सोमनाथ डुक्रे, नितीन निकम, रावसाहेब खडके, ईश्वर खिलारे, रवींद्र शिरसाठ, लक्ष्मण वर्पे, शिवाजी पेरणे, भाऊसाहेब धागुडे, उत्तम बनसोडे, धनंजय कदम, अनिल गायकवाड, एजाज पठाण, आकाश वाघमारे, बाळासाहेब औटी, सोहेल पठाण, संजय गायकवाड, चरण धागुडे, कुलदीप नवले, गणेश नेहे, बाबा जाधव, जकिर शेख, सौरव निमसे, नंदू जाधव, शुभम फसले, बाळासाहेब बनसोडे, लक्ष्मण बनसोडे, नंदकुमार पाटोळे, उत्तम खाटेकर, गणेश वाघ, तलाठी शरद गिते यांच्यासह महिला व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमामुळे तांदुळवाडी गावात उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले असून युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *