पो.नि.संजय ठेंगे यांचा कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान; ‘ऑपरेशन मुस्कान’मधील कामगिरीचा गौरव

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे : अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणांचा छडा लावत ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत १०५ मुलींची सुखरूप सुटका तसेच वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राहुरी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश (फोर्स वन व प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई) तसेच पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला भेट दिली. ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेत राहुरी पोलिसांनी प्रभावी तपास करत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांची सुटका केली. संबंधित आरोपींना अटक करून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

तसेच बेलवंडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने विविध राज्यांतील रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून वेठबिगारीत अडकविण्यात आलेल्या २३ वेठबिगारांची मुक्तता केली होती. या धाडसी कारवाईबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या दुहेरी यशामुळे राहुरी व बेलवंडी पोलिसांची प्रतिमा उंचावली असून, नागरिकांकडूनही पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *