राहुरी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाश पारख

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे) : राहुरी शहरातील व्यापारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे आणि संघटनात्मक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे प्रकाश पारख यांची राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. गुरुवारी (ता. ५) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत २२ सदस्यांच्या एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या पुनर्निवडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शहराच्या व्यापारपेठेला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बैठकीच्या प्रारंभी मागील कार्यकाळातील कामांचा आढावा घेण्यात आला. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पारख यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत प्रभावी भूमिका बजावल्याचे सदस्यांनी नमूद केले. त्यांचा अनुभव आणि व्यापाऱ्यांमधील विश्वासार्हता लक्षात घेऊन विलास तरवडे यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले.

स्थानिक व्यापाराला चालना देणार

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पारख म्हणाले, ‘‘ऑनलाईन स्पर्धेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांपुढे मोठी आव्हाने उभी आहेत. त्यावर मात करण्यासाठी ‘आपला स्थानिक व्यापारी, आपली जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात येईल. स्थानिक ग्राहकांना राहुरी बाजारपेठेकडे आकर्षित करून उलाढाल वाढविण्यावर भर दिला जाईल.’’

‘व्हिजन २०२६’ अंतर्गत उपक्रम

नवनिर्वाचित कार्यकाळात असोसिएशनतर्फे व्यापारी विकासासाठी काही ठोस उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा अधिकृत डेटाबेस तयार करणे

जीएसटी, परवाने व शासकीय योजनांसाठी मार्गदर्शन केंद्र

नवउद्योजकांसाठी व्यवसाय व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरे व्यापाऱ्यांच्या तक्रारींसाठी विशेष समस्या निवारण समिती मान्यवरांची उपस्थिती या बैठकीस ज्येष्ठ नेते विलास तरवडे, देवेंद्र लांबे, संतोष लोढा, नवनीत दरक, विलास उदावंत, अनिल डावखर, अनिल कासार, एकनाथ खेडेकर, मोहन जोरी, सूर्यकांत भुजाडी, कांता तनपुरे, ॲड. संतोष आळंदे, स्वप्निल कासार, योगेश चुत्तर, दीपक मुथा, माधव बिडवे, प्रवीण दरक, बाळासाहेब उंडे, गणेश नेहे, अख्तर कदरी, प्रवीण ठोकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर पारख यांचा सत्कार करण्यात आला.व्यापारी एकजुटीच्या बळावर राहुरीची बाजारपेठ अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *