अकोले वेब टीम ३०:
तालुक्यातील शेकईवाडी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे धडक कारवाई केली. या कारवाईत हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली असून एका महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त करण्यात आले आहे.
अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकला.
छाप्यावेळी लॉजच्या रूम क्रमांक २ मध्ये एक महिला आढळून आली. चौकशीदरम्यान हॉटेल मॅनेजर सुनील शांताराम शिंदे (वय ४५, रा. शेकईवाडी, ता. अकोले) हा आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 53/2026 नुसार अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. मोहन बोरसे, पो.स.ई. खांडबहाले, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. अशोक गाडे, तसेच अकोले पो.स्टे. चे पो.कॉ. गोरे, पो.कॉ. इंगळे, म.पो.ना. वाडेकर यांनी केली आहे.