राहुरी वेब प्रतिनिधी,२८ जानेवारी २६( शरद पाचारणे )-
राहुरी शहरातील पोलीस यंत्रणेला लवकरच नवे, प्रशस्त आणि अद्ययावत पोलीस स्टेशन मिळणार असून नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब यांनी बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी नूतन पोलीस स्टेशन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते.
वाकचौरे साहेब यांनी संपूर्ण इमारतीसह परिसराची सखोल पाहणी करत बांधकामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या व मौल्यवान मार्गदर्शक सूचनाही दिल्या.
यावेळी त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले की, पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व योग्य पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. तसेच नवीन इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या परंतु सध्या वापरात नसलेल्या जुन्या निवासस्थानांचे पाडकाम करून परिसर स्वच्छ करावा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. याशिवाय छताचे वॉटरप्रूफिंग अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे व कोणत्याही परिस्थितीत पाणी गळती (लिकेज) होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नूतन पोलीस स्टेशनची इमारत लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटन करण्यात येईल व येथे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे या इमारत बांधकामावर नियमित लक्ष ठेवून असून वेळोवेळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. त्यामुळे काम वेगाने व नियोजनबद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.