राहुरी वेब प्रतिनिधी, २८जानेवारी (शरद पाचारणे) : शहरातील पोलीस यंत्रणेला लवकरच हायटेक आणि प्रशस्त नवी इमारत मिळणार असून राहुरी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी बुधवार (दि. 28) रोजी नूतन इमारतीची सखोल पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच या इमारतीतून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते. वाकचौरे यांनी संपूर्ण इमारतीसह आजूबाजूच्या परिसराची पाहणी करत बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. काही बाबींवर त्यांनी मौल्यवान मार्गदर्शक सूचना देत काम अधिक परिणामकारक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नूतन पोलीस स्टेशनमुळे नागरिकांना अधिक सुविधा मिळणार असून पोलिसांच्या कामकाजातही गती येणार आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे स्वतः नियमितपणे इमारतीला भेट देऊन कामावर लक्ष ठेवत असल्याने बांधकाम वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे.